महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

प्रकटन

                          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या आठ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दिनांक ४ मार्च, २०१० पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १६, २६,३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ९, ०१,४७१ विद्यार्थी आणि ७, २४, ८७१ विद्यार्थिनी आहेत. एकूण १९, ४७८ शाळांमध्ये हे विद्यार्थी नोंदणी झालेले असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात ३६९२ परीक्षा केंद्रे आहेत.
                                                                    
                                                                                     सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
   १)       इयत्ता १० वी इंग्रजी (तृतीय भाषा) व गणित या विषयांकरिता प्रचलित बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू राहील.बहुसंची प्रश्नपत्रिका संचामध्ये फक्त पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांमध्ये सुमारे ३० टक्के पर्यंत फरक असेल.

   २)     माध्यमिक शालांत परीक्षेच्या ३ भाषा विषयांच्या एकत्रित उत्तीर्णतेसाठी एकूण गुणांची बेरीज १०५ असणे आवश्यक आहे.     मात्र या तीन भाषांपैकी अनुत्तीर्ण असलेल्या भाषेमध्ये / भाषांमध्ये किमान २५% गुण आवश्यक असून, हि सवलत एकाच परीक्षेस तीनही भाषांची परीक्षा दिली असल्यासच अनुज्ञेय राहील.

   ३)     माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रचलित अभ्यासक्रमातील गणित (बीजगणित + भूमिती ) विषयाच्या अभ्यासक्रमास पर्याय म्हणून सामान्य गणित भाग १ व २ हा विषय २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यातआला असून मार्च २०१० मध्ये प्रथमच परीक्षा घेण्यात येत आहे. सामान्य गणित विषयासाठी देखील बहुसंची प्रश्नपत्रिका राहील.

    ४)    माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इ. ८ वीचे ) सिंधी द्वितीय व संयुक्त भाषा आणि तेलगु व कन्नड २/३ भाषा विषयाची परीक्षा सन २००९-२०१० वर्ष अ त्यापुढील शैक्षणिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या नवीन पाठ्यपुस्तकात होणार आहे.

    ५)    माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पर्यावरण शिक्षण विषयाच्या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या प्रकल्पास ४० पैकी व लेखी परीक्षेस ६० पैकी गुण निर्धारित करण्यात आले आहेत. या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी प्रकल्पासाठी ४० पैकी १४ गुण व लेखी परीक्षेत ६० पैकी २१ गुण (१४+२१=३५) मिळवणे अनिवार्य आहे.

    ६)    मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार व मा. आयुक्त, अपंग कल्याण कार्यालय यांचे प्राप्त सूचनांचे आधारे अध्ययन अक्षम (डिसलेक्सिया, डिसकॅलक्यूलिया आणि डिसग्राफिया) दृष्टिहीन , अल्पदृष्टी, अस्थिव्यंग व सेरेबल पाल्सीने बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या सवलती देण्यात येतील. तसेच सर्व विषयांसाठी एकाच  लेखनिक वापरणे बंधनकारक आहे तथापि अपवादात्मक परिस्थितीत याबाबतचा निर्णय घेऊन मान्यता देण्याचा अधिकार संबंधित केंद्र संचालकांना आहे. मात्र सविस्तर अहवाल मंडळास  पाठविणे केंद्रासंचालाकांना बंधनकारक आहे.
 
    ७)    परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखणे व परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसराचे व्हीडीओ चित्रीकरण , शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यावर्षी प्रत्येक  जिल्हयासाठी ७ याप्रमाणे ३५ जिल्हयासाठी २४५ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
 
     ८) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व पालक यांना परीक्षेचे वेळापत्रक,प्रवेशपत्र,विषयबदल,ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावयाची तसेच परीक्षा विषयक येणाऱ्या  तक्रारींचे तत्काळ निवारण  करणे यासाठी विभागीय मंडळनिहाय हेल्पलाईन ,दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे उपलब्ध  करून दिलेले  आहेत.
 
                             उपरोक्त बाबी वेळोवेळी परिपत्रकान्वये सर्व शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कळविण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबधित शाळांशी संपर्क साधावा.

                                                        विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये.
        माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्रावरील(Hall Ticket)  स्वतःचे नाव, बैठक क्रमांक, विषयाचे नाव, सूचना व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे. तसेच काही अडचण असल्यास विभागीय मंडळाच्या खाली नमूद केलेल्या हेल्पलाईन द्वारे मार्गदर्शन मिळवावे.

                                                 परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा !


पुणे ४११००४                                                                                                                                              सचिव 
दिनांक: २ मार्च, २०१०                                                                                                                           राज्यमंडळ, पुणे-४
 
अ.क्रं. विभागीय मंडळे दूरध्वनी क्रमांक अ.क्रं. विभागीय मंडळे दूरध्वनी क्रमांक
  पुणे    (020)-25536712 नाशिक (0253)-2592143
नागपूर    (0712)-2553503 कोल्हापूर (0231)-2696103
औरंगाबाद  (0240)-2331102 अमरावती (0721)-2662608
मुंबई  (022)-27893756 लातूर    (02382)-228570